रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गरजुनां दिवाळी फराळ, कपडे तसेच मिठाई वाटप

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) दिवाळी हा सण सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु समाजातील काही घटक असे आहेत की त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा त्यांना आनंद घेता येत नाही. समाजात अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत. या व्यक्तींनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून जिथे जमेल तिथे सहकार्य करुन या गरीब लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केला तर नक्कीच कोणीही वंचित घटक रहाणार नाही असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

 

रामलिंग येथे अनेक वर्षापासून भिल्ल समाजातील लोक रहात असुन त्यांना रहायला पक्की घरे नसल्याने झोपडीत राहुन दररोज मिळेल ते काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात. सध्या सगळीकडेच दिवाळी सणाची धामधूम चालु आहे. परंतु समाजातील या गरीब लोकांना मात्र सगळेच दिवस सारखे त्यामुळे रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था दरवर्षी या वंचित घटकांना दिवाळी निमित्त खारीचा वाटा उचलत त्यांना फराळ वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करत असते.

 

आपण आपल्या घरी एक पणती पेटून उजाळा निर्माण करतो. परंतु प्रत्येकाने एका वंचित व्यक्तीचा जीवनात एक आधाराची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करावा. हिच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल. मला संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम साजरे करायला आवडतात. यातुन एक आत्मिक समाधान मिळते आणि पुढच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण होतो असेही कर्डीले म्हणाल्या.