घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच ‘वरातीमागुन घोड’ शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान एकुण ३५ हजार रुपये किंमतीची ७ ब्रास वाळू अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची फिर्याद न्हावरे येथील मंडळ अधिकारी नंदकुमार संपतराव खरात यांनी दि २० ऑगस्ट २०२४ रोजी शिरुर पोलिसस्टेशन येथे दिली आहे.

 

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १५ ऑगस्ट२०२४ रोजी रात्री १० ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान चिंचणी येथील घोड जलाशयाच्या कडेचा गायरान गट क्रं ७५ तसेच गुनाट (कोळपेवस्ती) येथील चिंचणी जलाशयाचे कडेचा जमिन गट क्रं १६३ मधुन घोड धरणातील पाण्यातुन यांत्रिक बोटीच्या साह्याने एकुण ७ ब्रास प्रति ब्रास ५ रुपये प्रमाणे एकुण किंमत ३५ हजार रुपयांची वाळू अज्ञात चोरटयांनी काढून ती स्वतःच्या फायदयाकरिता चोरी करुन घेवुन गेला असल्याने त्या अज्ञात चोरट्याविरुध्द सरकारतर्फे नंदकुमार खरात यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विशाल कोथळकर हे करत आहेत.

 

महसूल विभागाला उशिरा आली जाग…

गेल्या दोन महिन्यांपासुन चिंचणी येथील घोड धरणात रात्रीच्या वेळेस ५ ते ६ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालु असुन ‘वरातीमागुन घोड’ या म्हणीप्रमाणे महसूल विभागाला उशिरा जाग आली असुन सात ब्रास नव्हे तर कमीत कमी आजपर्यंत अंदाजे एक हजार ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा या ठिकाणी झाल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.

 

वाळूमाफिया जोमात महसूल विभाग कोमात…

घोड धरणाच्या कडेला असलेल्या शिरुर तालुक्यातील चिंचणी, गुनाट तसेच श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, दानेवाडी आणि आजूबाजूच्या गावातील वाळू माफिया रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटिंच्या साह्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून बेसुमार तसेच बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे शिरुरचे तहसीलदार, प्रांतअधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 

वाळूच्या यांत्रिक बोटिंमुळे शेतकऱ्यांचे नुकसान…

घोड धरण हे मातीचे धरण असुन या धरणाला २९ दरवाजे आहेत. या धरणाच्या दरवाज्याच्या अगदी जवळच यांत्रिक बोटीच्या साह्याने वाळू उपसा केला जातो. त्यामुळे भविष्यात घोड धरणाच्या मातीच्या भिंतीला तसेच दरवाज्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी तसेच पाण्यातील पाईप यांचे या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटिंकडुन नुकसान होत आहे. परंतु वाळू माफियांच्या दहशती पायी शेतकरी त्यांची तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने चित्र निर्माण झाले आहे.

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?