शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या पुर्व भागातील इनामगाव गावाच्या हद्दीत गांधले मळा येथील घोडनदीच्या बंधा-याचे रात्रीच्या वेळेस ढापे चोरण्याचा (दि २५) रोजी चोरटयांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेवुन टेम्पो जागेवरच सोडुन चोर काटेरी झुडपांचा फायदा घेत आजूबाजूच्या शेतामध्ये पळुन गेले होते. परंतु शिरुर पोलिसांनी गोपनिय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे टेम्पो चालक सुरेश पंढरीनाथ पवार (रा. कासारवाडी, पुणे) यास शिताफिने अटक केली असुन इतर चोरट्यांचा तपास चालू आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणारे पोलीस नाईक खबाले यांना बंधा-याजवळ निर्जन ठिकाणी अज्ञात चोरटे बंधा-याचे ढापे टेम्पोमध्ये भरुन चोरुन नेत असल्याची खबऱ्याकडुन माहिती मिळाली. त्यानंतर खबाले यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर ढापे चोरी करणा-या अज्ञात ३ ते ४ चोरटयांना घटनास्थळी जावुन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेवुन टेम्पो जागेवरच सोडुन चोर काटेरी झुडपांचा फायदा घेत आजूबाजूच्या शेतामध्ये पळुन गेल्याने पोलिसांनी चोरी करण्याकरिता आणलेला टेम्पो क्रं एम एच १२ एच डी ३५९७ हा तात्काळ ताब्यात घेतला.
त्यानंतर आरोपींचा शोध घेण्याकरीता शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस पथक तयार करुन शोध घेण्यास सुरुवात केली असता गोपनिय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे टेम्पो चालकाचा सुगावा लागताच पोलिसांनी त्याला अटक करत ३ लाख ५५ हजार ३२० रुपये किंमतीचे ५६ लोखंडी ढापे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गुन्हयात वापरलेला टेम्पो असा एकुण ७ लाख ५५ हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्याच्या इतर साथीदारांचा स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पुणे अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,सहायक पोलीस निरीक्षक संदिप यादव, पोलिस नाईक खबाले, जगताप, पोलीस कॉन्स्टेबल पिठले, संतोष साळुंखे यांनी केलेली असुन या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक नाथसाहेब जगताप हे करत आहेत.