शिरुर; माऊली गव्हाणेच्या पार्थिवावर तब्बल दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार; दुसरा आरोपी अटक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

दाणेवाडी येथुन रविवार (दि १६) रोजी एका आरोपीला रात्री अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०) रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या गुन्ह्यातील त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज सोमवारी (दि १७) रोजी अटक करण्यात आली असुन दोन्ही आरोपीनी खुनाची कबुली पोलिसांनी दिली आहे.

दोन्ही आरोपींचे समलैंगिक संबंध माऊली गव्हाणे यास माहिती झाले होते. त्यातूनच समलैंगिक जोडप्याने माऊली गव्हाणे यांची निर्घृण हत्या केली आहे. अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली असून याबाबत मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच माऊलीचा अंत्यसंस्कार हा आरोपी सागर गव्हाणे याच्या घरासमोर करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी संतप्त होऊन सांगितले होते. परंतु पोलिसांनी मध्यस्ती करत नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर माऊलीचा अंत्यसंस्कार दाणेवाडी येथील घोडनदी तीरावर करण्यात आले.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार मुख्य आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे व त्याचा साथीदार असलेला एक अल्पवयीन मुलगा या दोघांचे मागील अनेक दिवसांपासून समलैंगिक संबंध होते. त्यांच्या संबंधाबाबत माऊली गव्हाणे याला माहिती होती. तसेच माऊली गव्हाणे ही माहिती बाहेर कोठे तरी सांगेल…? या भिती पोटी त्या दोघांनी माऊलीचा ‘काटा’ काढण्याचे ठरवले.

त्यामुळे सागर गव्हाणे व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी गुरुवार (दि ६) मार्च रोजी दुपारी ४:३० वाजता माऊलीशी चर्चा करण्याचे नाटक केले आणि त्यानंतर संबंधित विषय रात्री बसून मिटवून टाकू असे सांगितले. यावेळी आरोपींनी माऊलीला सांगितले की,आम्ही तुला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॅटरीचा उजेड तुझ्या घराकडे दाखवु त्यानंतर तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये. त्यानुसार बॅटरीचा उजेड पाहून माऊली रात्री सुमारे ११:३० वाजता त्या समलैंगिक जोडप्याकडे गेला.

त्यानंतर सागर व त्याचा अल्पवयीन समलैंगिक साथीदार यांनी माऊलीला दाणेवाडी येथील परिसरात झुडपामध्ये नेऊन एका गमजाने आगोदर फाशी दिली. त्यानंतर येथील परिसरातील गोपाळवाडी येथील एका बंद खोलीमध्ये नेऊन इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने दोन्ही हात,शीर,पाय धडावेगळे केले आणि आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी शीर,एक पाय आणि दोन हात व धड हे अवयव घोडनदीच्या लगतच असलेल्या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये पोत्यात दगडी भरून फेकून दिले.

माऊली गव्हाणे यांचा खून झाल्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी १० दिवस उलटून गेले होते.त्यामुळे जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही. असा आक्रमक पवित्र माऊली गव्हाणे याच्या नातेवाईकांनी घेतला होता. अहिल्यानगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सागर गव्हाणे याला रविवारी (ता.१६) रात्री उशिरा पकडले होते. त्यानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर दाणेवाडी येथील स्मशानभूमीत आज सोमवार (दि १७) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अहिल्यानगर पोलिसांकडून अद्यापही तपास संपलेला नाही. असे सांगण्यात येत आहे.