रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या दाखवत बेकायदेशीर पैसे वसुली सुरुच 

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या छापुन वाहनचालकांना जबरदस्तीने दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पैसे वसुली करण्याचा काही लोकांचा सपाटा सुरुच असुन याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर काही दिवस हि वसुली थांबली होती. परंतु परत आता हि टोळी सक्रिय झाली असुन पुन्हा एकदा बेकायदेशीर पावत्या वसुली सुरु झाली आहे. तसेच यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईकच माथाडीच्या नावाखाली खंडणी वसुल करतात अशी धक्कादायक माहिती खात्रीलायक सूत्रांकडुन पुढे आली आहे.

शिरुर तालुक्यात सुमारे 25 वर्षांपुर्वी आशिया खंडातील पाहिली पंचंतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत उभी राहिली. त्यात अनेक नॅशनल आणि मल्टीनॅशनल कंपन्या आल्याने स्थानिक बेरोजगार युवकांना काही प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या. त्यात कमी शिक्षण असणाऱ्या युवकांना माथाडीत काम मिळाले. परंतु त्यानंतर येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी याच माथाडीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एमआयडीसीत आपले वर्चस्व निर्माण करत दहशत निर्माण केली. त्यानंतर त्यांनी औद्योगिक वसाहतीत भांडण, मारामारी करुन स्वतःचे वेगवेगळे ग्रुप तयार करुन उदयास आलेल्या भाई आणि दादांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. त्यांच्याकडे असलेल्या ‘मनी’ आणि ‘मसल पावर’ मुळे विविध पक्षांनी त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या आणि या दादांना आपल्या पक्षात घेऊन अनेक राजकीय पद देऊन त्यांना राजकीय पाठबळ देत शिरुर तालुक्यात आपल्या पक्षाची ताकत वाढवली.

त्यामुळे याच राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक सध्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी माथाडीच्या नावाखाली वाहनचालकांना दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पावत्या फाडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु एमआयडीसीत माल घेऊन येणारे वाहनचालक हे अनेकदा बाहेरच्या राज्यातून येत असल्याने ‘नको ती डोक्याला कटकट’ असे म्हणतं पोलिसांकडे जाण्याचे टाळत असल्याने या वसुली करणाऱ्या लोकांचं धाडस वाढत आहे. तसेच रांजणगाव MIDC तील ढोकसांगवी गावच्या हद्दीत असलेल्या दोन कंपनीत हे वसुली बहाद्दर बोगस पावत्या छापून पैसे वसुली करत आहेत.

अनेकावेळा तक्रार करुनही कारवाई मात्र शून्य…

रांजणगाव MIDC त अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन असुनही त्याठिकाणी सर्रास वाहने उभी केलेली असतात. पोलिसांनी यावर वारंवार कारवाई करत लाखोंचा दंड वसुल केलेला आहे. परंतु अजुनही रांजणगाव MIDC त बेशिस्तपणे वाहने उभी केलेली असतात. याचाच फायदा घेत माथाडी च्या नावाखाली बोगस पैसे वसुली केली जात असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील) आणि शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांनी केला आहे.