शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सोडत (दि. २३) एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता शिरूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे होणार आहे, अशी माहिती शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहेे.

या आरक्षण प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांनी आदेश क्रमांक पसप-२/कावि/४०६/२०२५ दिनांक १७/०४/२०२५ अन्वये संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. यामध्ये अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी विविध प्रवर्गांमध्ये आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण सोडतीच्या प्रक्रियेस सर्व संबंधित माजी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व इतर मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार पारदर्शक व नियमानुसार ही आरक्षण सोडत शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येणार असून, ग्रामविकास व सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.