मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले आहेत.

या निकालामुळे मुंबई महापालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा अपेक्षित प्रभाव मतदारांवर पडलेला दिसून आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ६५ जागा मिळाल्या असून तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबईची सत्ता निसटली आहे.

“भाजप शिवसेना संपवू शकत नाही”; उद्धव ठाकरे

निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, हे या निकालांनी स्पष्ट केले आहे. भाजप जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणांचा गैरवापर करावा लागला नसता,” असा आरोप त्यांनी केला.

“मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा होती”

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,“आजही निवडून आलेले शिवसैनिक साधेच आहेत. प्रचंड पैशांच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी लढू शकते आणि जिंकू शकते, हे या शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. मी सर्व मुंबईकरांचे मनापासून आभार मानतो. मात्र मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती.”

ते पुढे म्हणाले की, “२५ वर्षे आम्ही मुंबईसाठी सेवा केली, सुधारणा केल्या. कोविड काळात राबवलेल्या मुंबई मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली. हे सगळं पाहता मुंबईकर अधिक आशीर्वाद देतील, अशी अपेक्षा होती. मोठ्या प्रमाणावर नसले तरी जे आशीर्वाद मिळाले आहेत, तेही महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत.”