प्रयागराजमध्ये माघ मेळ्यावरून वाद पेटला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, आंदोलन तीव्र

महाराष्ट्र

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील मतभेद आता थेट आंदोलन आणि कायदेशीर नोटीशीपर्यंत पोहोचले आहेत.

माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानस्थळी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आंदोलन सुरू केले असून प्रशासनाने सार्वजनिक माफी मागावी, अशी ठाम मागणी केली आहे. हे आंदोलन अद्याप सुरूच आहे.

दरम्यान, या वादाला आणखी धार देत माघ मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना थेट नोटीस बजावली आहे. या नोटीशीत “तुम्ही शंकराचार्य कसे आहात, हे सिद्ध करा” असे आव्हान देण्यात आले असून यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. प्रशासनाने यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निरीक्षणांचा हवाला दिल्याची माहिती आहे.

या नोटीशीनंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “मी शंकराचार्य आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा भारताचे राष्ट्रपतीही शंकराचार्य कोण हे ठरवू शकत नाहीत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, भारतातील द्वारका पीठ आणि श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य मला शंकराचार्य म्हणून मान्यता देतात. मागील माघ मेळ्यात या दोन्ही पीठांच्या शंकराचार्यांसोबत मी स्नान केले आहे. “जर द्वारका आणि श्रृंगेरीचे शंकराचार्य मला मान्य करत असतील, तर आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे?” असा सवालही त्यांनी केला.

शंकराचार्य पदाबाबत निर्णय देण्याचा अधिकार कोणालाही, अगदी भारताच्या राष्ट्रपतीलाही नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे. या प्रकरणामुळे धार्मिक परंपरा, प्रशासनाचा हस्तक्षेप आणि अधिकारक्षेत्र यावर नवा वाद उभा राहिला असून येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.