‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत ऐतिहासिक विवाहसोहळा; महाराष्ट्रासाठी भावनिक क्षण

मनोरंजन

मुंबई: प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेतील प्रत्येक टप्प्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण उलगडणार आहे. सावित्री आणि जोतीराव फुले यांचा विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा प्रसंग केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

या भव्य विवाहसोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी, भव्य आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे. सावित्री आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील हा निर्णायक क्षण सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.

खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याच्या मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंतचे सर्व विधी श्रद्धेने साजरे होताना पाहायला मिळणार आहेत. चुडा भरण्याचा हळुवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागील सांस्कृतिक व भावनिक अर्थ या सर्व पारंपरिक रितीरिवाजांचे सुंदर दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय ठरत असून विशेषतः लहानग्या सावित्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द हे सारे गुण लहान सावित्रीच्या भूमिकेत प्रभावीपणे दिसून येतात.ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज आणि प्रामाणिक अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अत्यंत जिवंत केलं आहे.

दरम्यान, सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले यांनीही तक्षाच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं आहे. त्या म्हणाल्या,“छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडली आहे. तिचा अभिनय पाहताना मला प्रचंड अभिमान वाटतो. पहिल्यांदा तिला भेटल्यावर माझ्याच लहान रूपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची शिस्त, मेहनत आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका मनापासून जगते.”

आगामी भागांमधून उलगडणारा हा ऐतिहासिक विवाहसोहळा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार असून मालिकेची भावनिक उंची आणखी वाढवणारा ठरेल, यात शंका नाही.