आखाती संघर्षाची झळ पुण्याला! पेट्रोल-डिझेल व गॅस टंचाईची चिन्हे

महाराष्ट्र

पुणे: पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही भागांत गॅस वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी शहरातील पेट्रोल पंपचालकांना संदेश पाठवून पेट्रोल आणि डिझेलसाठी आधीच पैसे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी पेट्रोल पंपांना सात ते आठ दिवसांचे क्रेडिट दिले जात होते; मात्र सध्याच्या परिस्थितीत पैसे भरल्याशिवाय इंधनाचा पुरवठा केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पश्चिम आशियातील तणावामुळे खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे पुण्यातील गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गॅस, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे घरखर्च सांभाळणे कठीण होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. काही ठिकाणी गॅस ब्लॅकमध्ये विकला जात असल्याचे आरोपही नागरिकांनी केले आहेत.

व्यावसायिक गॅस महागला

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम म्हणून कमर्शियल एलपीजी गॅसच्या दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था करणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

वैकुंठ स्मशानभूमीत गॅस दाहिन्या बंद

गॅस टंचाईचा परिणाम आता अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. सदाशिव पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या पाच दाहिन्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन दिवसांपासून बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक लाकूड पद्धतीने करण्यात येत आहेत.तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन दरवाढ आणि पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.