महसूल विभागाच्या निर्णयांमुळे नागरिकांना मोठा दिलासा; चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र

‘महाराजस्व समाधान शिबीर’ लोकाभिमुख उपक्रम

मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने काम करत असल्याचे सांगत, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहावे शिबिर अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंगलप्रभात लोढा, हारून खान, विक्रांत पाटील तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.

बावनकुळे यांनी महसूल विभागाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देताना सांगितले की, अकृषक कायद्यातील सुधारणा, तुकडेबंदी कायदा रद्द करणे, व्हर्टिकल सातबारा, मोजणीनंतर नोंदणी व म्युटेशन प्रक्रिया आणि लँड टायटलिंगमुळे नागरिकांचे अनेक वर्षांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक व वादमुक्त होतील, असेही त्यांनी नमूद केले.

मंगलप्रभात लोढा यांनी महसूल विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करताना, प्रत्येक तालुक्यात होत असलेल्या महाराजस्व समाधान शिबिरांमुळे नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याचे सांगितले. तसेच उपनगर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या शर्तभंग झालेल्या जमिनी पुन्हा शासनाच्या ताब्यात आणल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे विशेष कौतुक केले.

शिबिरामध्ये नागरिकांना अधिवास, उत्पन्न, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सातबारा उतारे, फेरफार, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना कार्ड, निवडणूक उतारे, तृतीयपंथी कार्ड, बचतगट प्रमाणपत्रे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सदनिकांचे वितरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत