औरंगाबाद विभागात होणार 430 केंद्रांवर बारावीची परीक्षा; अशी आहे मंडळाची तयारी…

महाराष्ट्र

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे, तर बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला असणार आहे. यासाठी 58 परिरक्षक केंद्र असणार आहे.

यावेळी असा असणार बदल!

मात्र यंदाच्या या बोर्डांच्या परीक्षेसाठी काही विशेष निणर्य घेण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या दहावी आणि बारावी होम सेंटर पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 2021-22 मध्ये होम सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तशी परिस्थिती नसल्याने या दोन्ही परीक्षेत होम सेंटर पद्धत रद्द करण्यात आली आहे. या सोबतच दोन्ही परीक्षेदरम्यान यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. तर या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. दरम्यान परीक्षेत कॉपी होऊ नयेत म्हणून, परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.