‘लाडकी बहीण’ योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवणे, ई-केवायसीमुळे लाभ रोखणे आणि ₹२,१०० चे आश्वासन पूर्ण न करणे यावर काँग्रेसचे टीकास्त्र
मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी महायुती सरकारवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
‘मतांसाठी महिलांना “लाडकी बहीण” म्हणून संबोधले, मात्र सत्ता मिळाल्यानंतर लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले,’ असा आरोप त्यांनी केला आहे. बिक्कड यांनी प्रसिद्ध केलेल्या मतलेखात कॅग (CAG) अहवालाचा उल्लेख करत योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांच्या मते, ई-केवायसीच्या कारणास्तव लाखो महिलांचे लाभ थांबवण्यात आले असून, ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांसाठी ही प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. शासनाने ग्रामपातळीवर विशेष मोहीम राबवून ई-केवायसी पूर्ण करून घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, निवडणुकीपूर्वी दरमहा ₹२,१०० देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मंजूर आणि प्रत्यक्ष खर्चातील तफावत, अपात्र लाभार्थ्यांची निवड आणि प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करून सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘कल्याणकारी योजना ही सरकारची मेहेरबानी नसून पात्र नागरिकांचा हक्क आहे. महिलांच्या विश्वासाशी खेळल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील,’ असा इशाराही बिक्कड यांनी आपल्या मतलेखातून दिला आहे.