उल्हासनगर : उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयात सिटीस्कॅन, एक्सरे आणि इतर काही महत्त्वाच्या तपासण्यांच्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना सिटीस्कॅन व एक्सरे मशीन बंद असल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांना जवळील टाऊन हॉल परिसरातील केंद्रांमध्ये तपासणीसाठी जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यामुळे शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा जाणीवपूर्वक बंद ठेवून रुग्णांना खासगी केंद्रांकडे वळवले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. तसेच, चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.