पुणे नगर महामार्गासह परिसरात अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र कित्येक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने रस्त्यावर मोठ्या स्वरुपात पाणी होत कित्येक ठिकाणी रस्ते बंद होत शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) सह अनेक ठिकाणी बुधवार (दि. 28) दुपार नंतर पावसाने हजेरी लावली तब्बल दीड तास पावसाने थैमान घातले असताना रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

पुणे नगर महामार्गावर सणसवाडी, शिक्रापूर बजरंगवाडी, मलठण फाटा, कोंढापुरी, तळेगाव ढमढेरे येथील ओढ्यांना पूर येत पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ते देखील बंद झाले होते. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेकांची वाहने सुद्धा रस्त्यावर बंद पडल्याचे दिसले तर शिक्रापूर येथील मलठण फाटा येथील ओढ्यातून युवराज टेमगिरे हा युवक रस्त्याने जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडला. यावेळी नागरिकांनी त्याला बाहेर काढले.

मात्र सदर युवकाची दुचाकी पाण्यामध्ये वाहून गेली आहे अनेक ठिकाणी नागरिकांनी ओढ्याच्या कडेला केलेल्या अतिक्रमणाचा अनेकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून काही नागरिकांचे पावसामुळे मोठे नुकसान देखील झाले आहे.

रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली तर काही नागरिकांच्या दुकानात पाणी गेल्याने दुकानांचे सुद्धा नुकसान झाले. यावर्षी 4 ते 5 वेळा अशा स्वरुपाचा पाऊस झाला असून प्रत्येक वेळी शेतकरी व नागरिकांचे नुसकान झाले. मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्ताच्या मदतीसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.