shivaji-khedkar-ranjangaon

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (ता. ७) ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये बेकायदेशीर सावकारी, अवाजवी व्याज आकारणी, कर्जदारांना दिला जाणारा मानसिक त्रास, सावकारांविरोधात तक्रार करण्याची प्रक्रिया तसेच नागरिकांना उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी सांगितले की, अवैध सावकारांनी फसवणूक करून किंवा दबाव टाकून नागरिकांकडून खरेदीखत करून घेतले असल्यास संबंधित नागरिकांनी सहकार विभागाकडे तक्रार करावी. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये खरेदीखत रद्द करण्याबाबत सहकार विभागाच्या अधिकारक्षेत्रातील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे अवैध सावकारीला बळी पडलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी संघटनेचे शिवाजी नाना नांदखिले यांनी शेतकऱ्यांना कर्जाला घाबरू नये, असे आवाहन करताना शेतमालाचे उत्पादन वाढत असताना त्याला मिळणारा मोबदला कमी राहणे हे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक अडचणींचा सामना करताना अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकू नये, तसेच कायदेशीर व संस्थात्मक कर्जव्यवस्थेचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक कुमार कदम, एमआयडीसी पोलीस स्टेशन, रांजणगाव गणपती यांनी अवैध सावकारीसंदर्भात नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास घाबरू नये, असे सांगितले. नागरिकांना मानसिक त्रास, धमकी किंवा जबरदस्ती होत असल्यास त्याबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शेतकरी संघटना, जालना येथील लक्ष्मण वडले यांनी देखील अवैध सावकारी विरोधात तक्रारी करण्याचे आवाहन केले. दिपकजी गायकवाड, बाळासाहेब घाडगे यांनी देखील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून, सावकारांकडून होणारा त्रास, अवाजवी व्याज आकारणी, धमकी किंवा फसवणूक याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई वायदंडे, पंचायत समिती सदस्य विक्रम दादा पाचुंदकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम खेडकर, तसेच दिनेश लांडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके, नामदेवराव पाचुंदकर पाटील, संदीप कुटे, तुषार कुटे, हर्षद जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजाराम रासकर, कर्मचारी, शेतकरी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत