शिरूर (अरुणकुमार मोटे) : ‘पुढे पोलीस कारवाई व दंड करत आहेत, आम्हीही पोलीसच आहोत, तुमचे दागिने आणि पैसे सुरक्षित बॅगेत ठेवा,’ अशी बतावणी करत दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी दाम्पत्याची तब्बल ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावर घडली आहे. मौजे सरदवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीत भरदिवसा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अश्विनी मच्छिंद्र शेंडगे (वय ४०, रा. शांतीनगर, शिरूर) व त्यांचे पती मच्छिंद्र लक्ष्मण शेंडगे हे २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच १२ ईवाय ०८०१) मुलीला भेटण्यासाठी चंदननगर (पुणे) येथे निघाले होते. दुपारी १:२८ वाजण्याच्या सुमारास ते सरदवाडी हद्दीतील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आले असता, पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या ३५ ते ३६ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना हात दाखवून गाडी बाजूला घेण्यास सांगितले.
View this post on Instagram
शेंडगे दाम्पत्य खाली उतरताच भामट्यांनी आपण पोलीस असल्याचा बनाव रचला. “पुढे पोलीस दंड करत आहेत, अंगावरील सोन्याचे दागिने काढून द्या, ते आम्ही तुमच्याच बॅगेत सुरक्षित ठेवतो,” असे सांगत त्यांनी फिर्यादींचे १२ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले आणि ३३ हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे कानातील वेल काढून घेतले. त्यानंतर पती मच्छिंद्र शेंडगे यांच्याकडील ७ हजार रुपयांची रोख रक्कमही बॅगेत ठेवण्याच्या बहाण्याने स्वतःकडे घेतली. काही कळण्याच्या आतच हातचलाखी करत या भामट्यांनी दागिने आणि रोकड बॅगेत न ठेवता ती लांबवली आणि दुचाकीवरून पुणे दिशेने भरधाव वेगाने पळ काढला. शेंडगे दाम्पत्याने आपली बॅग तपासली असता त्यामध्ये ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ७ हजार रुपये रोख असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज नसल्याचे निदर्शनास आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अश्विनी शेंडगे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि २०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिरूर पोलीस ठाण्याचे अंमलदार पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त
शिरूरच्या भर बाजारपेठेत चोरट्यांचा धुमाकूळ! भरदिवसा फोडले वकिलाचे घर…
Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…