शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा वरिष्ठ पोलिसांकडून आढावा; अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे आव्हान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्देशानंतर यंत्रणा सक्रिय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांच्या प्रश्नावर अखेर वरिष्ठ पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज आणि ॲड. उदय सरोदे यांनी थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन शिरूर पोलिसांच्या कारभाराबाबत लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानंतर मंगळवारी (दि. २४) कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत रांजणगाव येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली.

शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याबाबत सातत्याने आवाज उठवूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी यापूर्वी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, या प्रश्नावर वरिष्ठ स्तरावरून ठोस हस्तक्षेप व्हावा, या उद्देशाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वाळुंज यांनी ॲड. उदय सरोदे यांच्यासह मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.

या भेटीदरम्यान शिरूर तालुक्यातील विविध गंभीर प्रश्न, पोलिसांच्या कामकाजाबाबतच्या तक्रारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या तक्रारींची दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना सहा आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही या प्रकरणात लक्ष घालत २४ नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, रांजणगाव येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, घोडनदी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. उदय सरोदे आणि पत्रकार बांधवांनीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या मांडल्या.

बैठकीत शिरूर तालुक्यातील परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक माने यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिल्याचे निलेश वाळुंज यांनी सांगितले. तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनाही विशेष सूचना देण्यात आल्याचे समजते.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या दखलीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दाखवलेली तत्परता स्वागतार्ह मानली जात आहे. मात्र, वरिष्ठ स्तरावरील बैठका आणि सूचनांचे रूपांतर प्रत्यक्ष कारवाईत होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिरूरमध्ये कायद्याचा धाक निर्माण होणार का? गंभीर गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण होणार का? अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन होणार का? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या प्रत्यक्ष कामगिरीतून मिळणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वरिष्ठांच्या दखलीमुळे शिरूरमध्ये लवकरच बदल अपेक्षित!

“वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. शिरूर तालुक्यातील तमाम नागरिकांच्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वपूर्ण असून, या बैठकीनंतर लवकरच प्रत्यक्ष बदल दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.”

ॲड. उदय सरोदे

जनहितासाठी लढा, वैयक्तिक हेतू नाही!

“जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही. सामान्य नागरिकांना सुरक्षित, निर्भय आणि न्याय्य वातावरण मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे रूपांतर आता ठोस कार्यवाहीत व्हावे आणि शिरूर तालुक्यात कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित व्हावे, हीच अपेक्षा आहे.”

निलेश मंदा यशवंत वाळुंज

सामाजिक कार्यकर्ते | व्हिसलब्लोअर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत