नवरात्रोत्सवानिमित्त उपवासात भगर खाल्ल्याने 37 जणांना विषबाधा…

क्राईम

औरंगाबाद: नवरात्रोत्सवानिमित्त उपवास मध्ये खाण्यासाठी खरेदी केलेल्या भगर आणि भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी १३ जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे..

लासूर स्टेशन येथे भगर आणि भगरीचे पीठ ग्रामस्थांनी खरेदी केले होते. मात्र या भगरीचे सेवन केल्याने १३ ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. त्यांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर म्हणाले, लासूर स्टेशन येथील दुकानातून संबंधितांनी भगर खरेदी केल्याचे समजले. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येईल. तर, अन्नबाधा झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे.

जालन्यात सुद्धा भगरीतून झाली विषबाधा

औरंगाबादप्रमाणे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातही भगर व भगरीचे पिठातून विषबाधा झाली आहे. परतूर तालुक्यातील 4 गावांमधील २४ जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर, विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.