औरंगाबाद: औरंगाबाद मधील प्रसिद्ध युट्यूबवर बिनधास्त काव्या गायब झाल्याची घटना घडली होती. मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हे नाटक रचले होते. कारण समाज माध्यमांवर फॅनकडून ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात कमाई होते. त्यामुळे अशा खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.
घरातून निघून गेल्यावर काव्या मध्य प्रदेशातील इटारसी स्थानकावर सापडल्यावर इटारसीच्या पोलिसांनी तिथल्या बाल न्याय मंडळासमोर तिला हजर करणं कायद्यानुसार बंधनकारक होतं. मात्र, या सर्व बाबींना फाटा देत पोलीस तिला सरळ औरंगाबादला घेऊन आले आणि आई-वडिलांच्या ताब्यात दिलं. हा सगळा खटाटोप फक्त पैशांसाठी केला गेला. त्यामुळे काव्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
याबाबत बोलताना बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने-कटके म्हणाल्या की, दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होतं. नागरिकांना भावनाविवश करुन लाइक करण्यास भाग पाडलं गेलं. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.