पुणे नगर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

क्राईम

शिक्रापूर पोलिसांच्या पथकांकडून चोरट्यांचा पाठलाग

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी नागरिकांना मारहाण करत लुटमार करत चांगलाच धुमाकूळ घातला असून शिक्रापूर पोलिसांनी सतर्कता राखत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असून पोलिसांच्या सतर्कतेने अन्य अनर्थ टळले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे कर्तव्य बजावत असताना कोरेगाव भीमा येथे एका युवकाला काही चोरट्यांनी मारहाण करत त्याचे पैसे काढून घेत शेजारील एका सोसायटी मधील दुचाकी चोरून नेल्याबाबतचा फोन पोलीस स्टेशन येथे आला त्यांनी तातडीने रात्रगस्त साठी असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांना माहिती दिली.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई अतुल पखाले हे कोरेगाव भीमा येथे गेले असता त्याच वेळी काही मिनिटांनी सदर चोरट्यांनी शिक्रापूर एल अँड टी फाटा येथे देखील एका युवकाला मारहाण करुन जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत त्या युवकाला उपचारासाठी हलवले.

मात्र चोरटे एल अँड टी फाट्याहून तळेगाव ढमढेरेकडे गेले कि फाटा भारत गॅस फाट्याकडे गेले कळेना त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सदर चोरट्यांनी अन्य कोणाला मारहाण करु नये व काही अनर्थ घडू नये, यासाठी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई अतुल पखाले, विकास मोरे, स्वप्नील गांडेकर यांचे दोन पथके बनवून भारत गॅस व तळेगाव ढमढेरे बाजूकडे पाठवले.

दरम्यान करंदी फाटा येथे दुचाकीहून गेलेले संशयित दोन युवक पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांना दिसले यावेळी पोलीस आल्याची चाहुन लागताच सदर युवक कोरेगाव भीमा येथून चोरुन आणलेली दुचाकी तेथेच सोडून जवळील एका इमारतीच्या भिंतीवरुन उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी पोलिसांच्या पथकाने करंदी गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांच्या मार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना संदेश देत माहिती दिल्याने नागरिक देखील जागे झाले. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी चोरट्यांचा आजूबाजूला शोध घेतला मात्र चोरटे मिळून आले नाही. मात्र पोलिसांनी तातडीने सतर्कता दाखवल्याने चोरट्यांकडून होणाऱ्या अन्य मारहाण तसेच चोरीच्या घटना रोखल्या गेल्या असून कोरेगाव भीमा येथे चोरट्यांनी चोरलेली दुचाकी देखील काही वेळेत मिळून आली असून पोलिसांच्या सतर्कतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

दोनच दिवसात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर

करंदी (ता. शिरुर) येथील ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बंद पडलेली असताना पोलीस पाटील वंदना साबळे यांनी स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु केली असताना दोनच दिवसात या ग्राम सुरक्षा यंत्रणेचे चांगला वापर दिसून आल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणेचे महत्व दिसू लागले आहे.