शिक्रापूर नजीक गॅसने भरलेला टँकर उलटला अन सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…

क्राईम

शिक्रापूर जवळ आठवड्यात दुसरी घटना

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करंदी गावच्या हद्दीत मागील आठवड्यात गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर विजेच्या खांबावर आदळल्याची घटना ताजी असताना आता येथील एल अँड टी फाटा ते भारत गॅस फाटा येथील पॉलीबाँड कंपनी नजीक (दि. 23) रोजी पहाटेच्या सुमारास गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर असल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल अँड टी फाटा ते भारत गॅस फाटा रस्त्याने भारत गॅस कंपनीतून गॅस भरुन चाललेला टी एन ८८ बी ५६५५ हा टँकर घेऊन टँकरचालक चाललेला असताना समोरुन भरधाव वेगाने वाहन आल्याने टँकर बाजूला घेत असताना अचानकपणे टँकर रस्त्याचे कडेला उलटला. मात्र यावेळी गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर रस्त्याचे कडेला उलटल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अपघात मदत पथकाचे पोलीस शिपाई अंबादास थोरे, प्रतिक जगताप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील सदर ठिकाणी धाव घेत गॅसने भरलेल्या टँकरची पाहणी केली

तर सदर टँकरच्या वरील बाजूला विजेच्या तारा असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विद्युत वितरण विभागाला माहित देत वीज पुरवठा काही काळ बंद करुन क्रेनच्या मदतीने गॅसने भरलेला टँकर बाजूला केला. सदर अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.