crime

शिरुर तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागापायी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केला ऍसिड हल्ला…

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात मागील झालेल्या भांडणाचा राग मनात कारणावरुन एका महिलेने शेजारीच राहणाऱ्या भावकीतील महिलेला शिवीगाळ करत सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या कॅन मधील ऍसिड अंगावर फेकल्याने सदर महिलेच्या डाव्या हाताचा दंड, पोटाची तसेच शरीराच्या इतर भागाची त्वचा ठीक ठिकाणी जळाल्याने ती महिला जखमी झाली असुन याबाबत पिडीत महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्याने शकुंतला सर्जेराव पवार (रा. वाघाळे, पवार वस्ती, ता. शिरूर जि. पुणे) या महिलेविरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनिता कुंदन पवार (वय 45) रा. वाघाळे ,पवार वस्ती ता. शिरूर जि. पुणे या आज (दि 20) रोजी सकाळी 7 च्या सुमारास जनावरांच्या गोठ्यातील साफसफाई करत असताना फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारी आरोपी महिला शकुंतला सर्जेराव पवार हिने मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन वाद घालत हाताने मारहाण करत सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या कॅन मधील ऍसिड फिर्यादी यांच्या अंगावर फेकल्याने फिर्यादीच्या डाव्या हाताचे दंड, तसेच पोटाची, मांडीच्या डाव्या बाजूची त्वचा ठीकठिकाणी जळून दुखापत झाली.

 

त्यानंतर फिर्यादी सुनिता पवार यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत आरोपी शकुंतला पवार हिच्या विरुद्ध फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.