लग्नाला विरोध केला म्हणून उचलल टोकाच पाऊल, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर…

क्राईम

नागपूर: प्रेमविवाहाला आजही अनेक ठिकाणी विरोध पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा प्रेमीयुगुल टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. लग्नाला घरच्यांचा विरोध होता म्हणून प्रेमीयुगुलाने आत्महत्या करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

अरुण सुखदास कोडवते (वय 22) रा. रयतवाडी- वडांबा असे यातील प्रियकराचे नाव आहे. तर अश्विनी रामेश्वर उईके (वय 22), रा. फुलझरी- जंगली असे त्याच्या प्रेयसीचे म्हणजे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना रामटेक तालुक्यातील रयतवाडी येथे घडली.

चार वर्षांपासून हे दोन्ही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अरुण कोडवते हा शेतकरी आहे. अश्विनी ही शेजारच्या गावातील तरुणी असून एका लग्नात त्यांची भेट झाली. यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अश्विनीच्या मोठ्या बहिणीचे लग्न व्हायचे असल्याने ते दोघेही दोन वर्षे लग्नासाठी थांबले.

दरम्यान, प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या भावाला लागली. त्यामुळे कुटुंबीय चिडले होते. तर इकडे अरुणच्याही घरी माहिती झाले. त्यालाही घरातून विरोध होता. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपूर्वी दोघेही एका ठिकाणी भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी अश्विनीने घरातून पळ काढत थेट अरुणचे घर गाठले. तर अचानक अश्विनीला घरी आल्याचे पाहिल्यावह अरुणही हादरला.

मात्र, त्याने आईवडील आणि भावंडाची समजूत घातली आणि लग्न लावून देण्यासाठी परिवाराला तयार केले. यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विनीचे 2 भाऊ अरुणच्या घरी आले. यावेळी त्यांनी अश्विनीला सोबत घरी येण्यासाठी दबाव टाकला असता तिने परत येण्यास नकार दिला. त्यामुळे दोघेही भाऊ घरी परतले. यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विनी आणि अरुण यांनी कीटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. यात अश्विनीचा मृत्यू झाला आहे तर अरुण नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.