मांडवगण फराटात घरातून साडेबारा लाखांची रोकड चोरी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराच्या कंपाउंडच्या तारा कापून आत प्रवेश करुन दरवाजाचा कोयंडा तोडून घरातील तब्बल 12 लाख 50 हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील सोहन तावरे हे काही कामानिमित्त ठाणे येथे राहत असून त्यांच्या गावाकडील घराच्या शेजारी त्यांचा कामगार राहतो. तावरे यांचा कामगार गावाला गेलेला होता. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा कामगार गावावरुन आला असता त्याला कंपाउंडच्या तारा कापल्याचे दिसले त्यामुळे त्याने दरवाजा पाहिला असता दरवाजाचे कडी कोयंडे देखील तुटल्याचे त्याला दिसले त्यामुळे त्याने तातडीने मालक सोहम तावरे यांना फोन करुन माहिती दिली.

तावरे तातडीने ठाणे येथून आले. त्यावेळी त्यांनी पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यामुळे त्यांनी कपाटांची पाहणी केली असता कपाटातील तब्बल 12 लाख 50 हजार रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत सोहन भारत तावरे (वय ३०) रा. मांडवगण फराटा (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पवार हे करत आहे.