कोरेगाव भीमात एटीएमच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल…

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीला ATM मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने युवकाचे ATM हातचलाखीने बदलून त्या युवकाच्या ATM मधून वेळोवेळी 70 हजार रुपये काढून घेत व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भारतीय स्टेट बँकेच्या ATM मध्ये ज्ञानेश्वर सोनवणे हे पैसे काढण्यासाठी आले असताना ATM मध्ये असलेल्या युवकाने पैसे काढून देतो असे म्हणत सोनवणे यांचे ATM घेतले. मात्र त्यावेळी सोनवणे यांच्या खात्यावर पैसे दाखवत नसल्याने सदर व्यक्तीने सोनवणे यांना ATM परत दिले. त्यानंतर सोनवणे घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यावरीन पैसे कट झाल्याचा मेसेज आला त्यामुळे त्यांनी ATM पाहिले असता सदर ATM त्यांचे नसल्याचे लक्षात आले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पैसे कट झाल्याचा मेसेज आला त्यांनतर सोनवणे यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत जाऊन खात्याची तपासणी केली असता त्यांच्या खात्यातून वेळोवेळी तब्बल 70 हजार रुपये काढून घेत सोनवणे यांची फसवणूक केल्याचे समोर आले.

याबाबत ज्ञानेश्वर भिमाजी सोनवणे (वय ४३) रा. बुर्केगाव ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.