पोलिसांत गुन्हा दाखल, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु
शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रीक मोटारी चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे (संगमवाडी) येथील घोडनदी पात्रालगत अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळून दोन शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 17 ते 18 एप्रिलदरम्यान घडली आहे.या प्रकरणी पोपट भाऊ खाडे (वय 65 वर्षे, धंदा – शेती, रा. म्हसे) यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रात दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे सविस्तर वृत्त असे आहे की, 17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पोपट खाडे यांनी अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळील घोडनदी पात्रात टेक्समो कंपनीची 7.5 एचपीची निळ्या रंगाची इलेक्ट्रीक मोटार लावून शेतीस पाणी देण्यासाठी सुरुवात केली. लाईट गेल्याने सकाळी 9 वाजता ते घरी परतले. त्याच ठिकाणी त्यांचे शेजारी संतोष प्रभु खाडे यांचीही मोटार कार्यरत होती.मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे शेतकरी मोटारी चालू करण्यासाठी गेले असता, दोन्ही मोटारी गायब असल्याचे दिसून आले. तसेच मोटारीचे वायर, पाईप्स कापलेले होते. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही मोटारी सापडल्या नाहीत. त्यामुळे चोरट्यांनीच या मोटारी लंपास केल्याची खात्री दोन्ही शेतकऱ्यांना झाली.या घटनेचा तपास पो.हवा. अरूण उबाळे करत आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या साधनांची चोरी होणे हे चिंताजनक असून, प्रशासनाने अशा प्रकारांवर लक्ष ठेवत चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे .