एलपीजी पंपांच्या मालकीतील भागीदाराचे नाव उडवून आईचे नाव लावले…

क्राईम

औरंगाबाद: भागीदारीमध्ये सुरु केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे एकाची भागीदारीच कमी करुन, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला शीतल आदित्य पांडेय (रा. एन ३, सिडको) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोनाली जाधव हिच्यासोबत (दि १) एप्रिल २०१८ रोजी पन्नास-पन्नास टक्के प्रमाणाच्या भागीदारीमध्ये अलायन्स एलएलपी नावाने करारनामा करुन विद्यानगर, गजानन महाराज मंदिर रोड आणि पद्मपुरा परिसरात दोन एलपीजीचे पंप सुरु करण्यात आले होते.

त्या दोन्ही पंपांचा दैनंदिन कारभार आरोपी महिला सोनालीचे पती श्रीकांत जाधव व फिर्यादी महिला शीतल हीचे पती आदित्य पांडेय पाहत होते. तीन वर्षापूर्वी भागीदारीमध्ये २० लाखांत सुरु केलेला व्यवसाय कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला असून आरोपींनी पैशांच्या लालसेपोटी संपूर्ण व्यवसायच गडप करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी महिला सोनालीने बनावट कागदपत्रे व सह्यांच्या आधारे फिर्यादी महिलेचे नाव कमी करुन तिची आई आशा देशमुख यांचे नाव भागीदारीत लावले. त्यानंतर दिनांक १९ जुलै रोजी सोनाली जाधव हिने फिर्यादीला दोघींतील भागीदारीचा व्यवहार रद्दबादल केल्याची नोटीस पाठवली. २५ जुलै रोजी नोटीस मिळाल्यानंतर फिर्यादी महिला व तिचे पती यांनी २८ जुलै रोजी जाधव यांना कायदेशीर उत्तर पाठवले.

त्यानंतर (दि. २५) नोव्हेंबर 2022 रोजी फिर्यादी महीलेचे पती आदित्य हे नेहमीप्रमाणे दैनंदिन रोख रक्कम गोळा करण्यासाठी विद्यानगर येथील गॅस पंपावर गेले असता तेथे श्रीकांत जाधव याने त्यांना अडवून, पुन्हा पंपावर यायचे नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर खात्री केल्यावर भागीदारीतून काढल्याचेही फिर्यादीला दिसून आले.

या प्रकरणी सोनाली श्रीकांत जाधव, तिचा पती श्रीकांत शिवाजीराव जाधव (रा. एन १, सिडको), आई आशा राजन देशमुख (रा. काटोल, जि. नागपूर), कंपनी सचिव प्रसाद सतीश टाकळकर (रा. उस्मानपुरा) आणि एस्से पेट्रोलियम कंपनीचे संचालक अय्युब पुवाथल्ली (रा. कालिकत, केरळ) यांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप काळे करीत आहेत.