शिरुर तालुक्यातील या गावात पुन्हा शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला…

क्राईम

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील शेती कामासाठी आलेल्या हरिश्चंद्र बारकू वाघमारे (मुळगाव रोहा जिल्हा रायगड) या शेतमजुरावर बिबट्याने सोमवार (दि. ५) रोजी मध्यरात्री हल्ला केला असून त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला जखम झाली आहे.

वाघमारे हे वडनेर येथील एकनाथ दामू निचित यांच्या शेतात कोपी बांधून राहत आहेत. मध्यरात्री लघुशंकेसाठी बाहेर येऊन परत कोपित प्रवेश करत असतानाच बिबट्याने पाठीमागून पायाच्या घोट्याला पकडले. वाघमारे यांनी पाय जोरात खेचून घेतला व मोठ्याने आवाज केला. तरीही बिबट्या तेथून हलला नाही. नंतर त्यांनी घरातील भांड्यांचा आवाज केला. त्या आवाजाने बिबट्या निघून गेल्यामुळे ते बचावले. या परिसरातील ही तिसरी घटना आहे.

यापूर्वी जांबुत, पिंपरखेड या ठिकाणच्या घटना ताज्या असतानाच ही तिसरी घटना घडल्याने या भागातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या भागातील बिबट्यांचे प्रमाण वाढले असून बेट भागातील टाकळी हाजी, माळवाडी, वडनेर, कवठे येमाई, मलठण या गावातही अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी वन विभागास कळविल्यानंतर वनपाल गणेश पवार, वनरक्षक सविता चव्हाण व ऋषिकेश लाड यांनी त्यांना टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य पर्यवेक्षक डॉक्टर भरत सोदक यांनी दिली. याबाबत वनपाल पवार यांना विचारले असता त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले.

बिबट्यांचे लोकांवरील हल्ले वाढले असल्याने वनविभागाने या भागात ठोस पावले उचलली नाहीत तर मात्र या भागातील जनतेला जीव मुठीत धरूनच जगावे लागणार आहे. रुग्णाच्या पायाला झालेली जखम ९ सेमीची असून साधारणपणे 8 ते 9 टाके पडतील त्यामुळे प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे असे मत टाकळी हाजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी प्रियंका घुगे यांनी सांगितले.