शिरुर (तेजस फडके): महावितरणचा मोकळ्या जागेत असणारा ट्रान्सफार्मर काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची अडवणुक करुन शिवीगाळ आणि दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याने कुरुळी (ता. शिरुर) येथील राहुल अंबादास बोरकर या व्यक्तीवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन याबाबत महावितरणचे कर्मचारी पपु आप्पासो मुंगसे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बोरकर याच्या शेताच्या जवळच असलेल्या मोकळ्या जागेत महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असुन मंगळवार (दि. १२) रोजी रात्री 8 च्या सुमारास महावितरणचे कर्मचारी पप्पु मुंगसे हे त्या ठिकाणी तो ट्रान्सफार्मर काढण्यासाठी गेले असता राहुल बोरकर याने त्या कर्मचाऱ्यांना “तुम्ही कोणाला विचारुन ट्रान्सफॉर्मर घेवुन चालले आहेत. तुम्हाला मी ट्रान्सफॉर्मर नेऊन देणार नाही” असे बोलून तिथं जेसीबी मशीन बोलावुन घेतली. तसेच ट्रान्सफार्मर नेण्यासाठी आणलेल्या पिकअप टेम्पोसमोरआणि बाजुने जेसीबी मशिनच्या साह्याने खड्डे करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच तुम्ही जर ट्रान्सफॉर्मर घेवुन गेला तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावुन आला.
त्यामुळे त्याच्या विरुद्ध महावितरणच्या कर्मचाऱ्याने शिरुर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असुन शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव पुढील तपास करत आहेत.