शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक काढत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): भारत देशाची सेवा करुन आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या 2 सैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांची शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत मिरवणूक काढून सेवा निवृत्त सैनिकांचा सन्मान केला असल्याने सैनिक देखील भारावून गेले आहे.

मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावचे भूमिपुत्र मेजर दत्तात्रय आण्णासाहेब मिडगुले व मेजर सोमनाथ सिताराम थोपटे हे नुकतेच सैन्यदलातुन निवृत्त होत देश सेवा करुन आपल्या मायभुमीत परतले. सेवानिवृत्त होत परतत असल्याने चिंचोली मोराची ग्रामस्थ व त्रिदल सैनिक सेवा संघटना यांच्या वतीने दोन्ही सैनिकांची त्यांच्या कुटुंबियांसह भव्य मिरवणूक काढत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान गावातील प्रथम सैनिक स्वर्गीय विष्णु सावळेराव उकिर्डे व स्वर्गीय कॅप्टन सदाशिव उकिर्डे यांच्या प्रतिमेचे पुजन करत सोहळा सुरु करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर आंबेगाव अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, मोराची चिंचोलीचे सरपंच अशोकराव गोरडे, उपसरपंच राहुल नाणेकर, त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप लगड, जी. के. कटके, ॲड. रेश्मा चौधरी, शामराव धुमाळ, बाळासाहेब नवले, सुरेश उमाप, संभाजी धुमाळ, सोसायटीचे चेअरमन सुभाष नाणेकर, पोलीस पाटिल अमित उकिर्डे यांसह त्रिदल सैनिक संघटना, शिवभिमान कला क्रीडा मंच, नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सैनिकांवर पुष्पवृष्टी करत त्यांच्या कुटुंबियांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तर ग्रामस्थांनी केलेल्या अनोख्या स्वागतातून सेवानिवृत्त होत असलेले सैनिक देखील भारावून गेले, तर आपल्या भागातील जवान देशाचे रक्षण करत सेवानिवृत्त होत असल्याची बाब युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी व्यक्त केले.