डोक्यात बसलाय, आज कायमचा बंदोबस्त करतो म्हणत तरुणाची निर्घृण हत्या

क्राईम महाराष्ट्र

लातूर: “लय दिवसांपासून तू माझ्या डोक्यात बसला आहेस, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो,” असे म्हणत दोन मित्रांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.प्रज्वल ऊर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. …) रात्री उशिरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील लाईफ लाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल मस्के हा आपल्या चुलत भावासोबत—आतिश मस्के—रविवारी रात्री सुमारे ११ वाजता हॉस्पिटलसमोर थांबला होता. याचवेळी आनंद नगर भागातील गणेश सुरेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी हे दोघे तेथे आले. जुन्या वादाचे निमित्त काढत गणेश गायकवाड याने प्रज्वलशी शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढत जाऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. संतापाच्या भरात गणेशने कमरेला लपवलेला धारदार चाकू काढून प्रज्वलच्या छाती, पोट, बरगड्या आणि मानेवर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.प्रज्वल कोसळताच, “गोट्याची विकेट पडली, पळ!” असे ओरडत दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

आमदार अमित देशमुखांची तत्परता

घटना घडली त्याचवेळी आमदार अमित देशमुख हे प्रचार सभा आटोपून बाभूळगावकडे जात होते. चौकातील गोंधळ आणि गर्दी पाहून त्यांनी तातडीने आपली गाडी थांबवली. आमदार गाडीतून उतरत असल्याचे लक्षात येताच हल्लेखोर पळून गेले.देशमुख यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. तसेच स्वतः विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचाराबाबत सूचना दिल्या. मात्र, उपचार सुरू असतानाच प्रज्वलचा मृत्यू झाला.

पहाटे आरोपींना अटक

या प्रकरणी आतिश मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पहाटे २.३० वाजता गणेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना अटक केली.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ते घटनेवेळी नशेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.

पोलीस काय म्हणाले?

“आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. मात्र या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,”अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी दिली.