सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून त्यावेळी काळूराम दरेकर यांचा गट विजयी होत गणेश उर्फ बन्सी दरेकर यांचा गट पराभूत झाला होता. त्यानंतर गणेश हा वारंवार काळूराम याचा पाठलाग करत होता, तर ९ ऑक्टोबर रोजी काळूराम हा कंपनीतून घरी जात असताना गणेश याने त्याला अडवून तुला सोसायटीच्या निवडणूक वेळी माज आला होता का, असे म्हणून दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी काळूराम पळून जाऊ लागला असताना गणेश याने दगडाने बेदम मारहाण करत काळूरामला जखमी केले.

याबाबत काळूराम तात्याभाऊ दरेकर (वय ३१) रा. खंडोबा आळी सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.