पुणे : पारगाव (ता. दौंड ) येथे युवकाने व्हॉटसअॅप स्टेटसला स्वत:लाच श्रद्धांजली वाहत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव परिसरात त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आदित्य ओव्हाळ (रा. आंधळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील आदित्य याचे पारगाव इथे मेडिकलही होते. त्याचे चार महिन्यांपूर्वीच लग्नही झाले होते. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आत्महत्येआधी आदित्यने स्टेटसला ११ फोटो लावले होते. त्यात शेवटचा फोटो टाकताना त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहिले होते. या स्टेटसनंतरच त्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. रेल्वे अंगावरून गेल्यामुळे त्याच्या शरिराचे तुकडे झाले होते. या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.