शिरूर तालुक्यात पुलाच्या बांधकामाचे साहित्य चोरटयांनी लांबविले अन…

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. (दि. २५) एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता ते २६ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे व पत्र्याच्या शेडचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आणि पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले. चोरट्याने अंदाजे 2,52,545 रुपये किंमतीचा माल चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

फिर्याद अजित बाळू येवले (वय 25), व्यवसायाने स्ट्रक्चर इंजिनिअर, रा. रेनवडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर यांनी दिली आहे. ही घटना कवठे येमाई गावाजवळील घोड नदीकाठावर घडली. चोरीस गेलेले साहित्य रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी अत्यंत महत्वाचे होते.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून चोरट्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.