शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शास्ताबाद-मलठण रस्त्यावर वाहतूक रस्त्यावरील वादातून एका महिलेसह तिच्या भावास बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी संबंधित महिलेस विनयभंगासह शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली असून, याप्रकरणी दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्राजक्ता बापूसाहेब गोरडे (वय २७, रा. शास्ताबाद, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २८जुलै रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे चुलत भाऊ संजय गोरडे हे मारुती स्विफ्ट (MH 12 -VV -1985) कारने मलठणकडे जात असताना लाखेवाडी येथील पडळवळ मळा येथे टाटा टिगोर (MH 12 -VV -1312) या कारने समोरून येत अडवले.वादविवाद सुरू झाल्यानंतर टाटा टिगोर कार चालक राजेंद्र तळवले याने रस्ता न देता शिवीगाळ केली. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या संकेत संतोष ननवरे (रा. कान्हूर मेसाई) याने गोरडे बंधूंवर हात उचलला. संजय गोरडे यास खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. प्राजक्ता गोरडे यांना कारमधून ओढून बाहेर काढत चेहरा, पोट, छाती व पाठीवर मारहाण करत अश्लील स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून वातावरण निवळवले. नंतर प्राजक्ता गोरडे व त्यांचे भाऊ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळी हाजी येथे गेले व नंतर टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक फौजदार साबळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार आगलावे तपास करत आहेत. सदरची घटना ही सार्वजनिक रस्त्यावर महिलेसह तिच्या भावावर करण्यात आलेल्या हल्ल्याशी संबंधित असून, आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.