Kawthe Yemai Mandir

कवठे येथील जाग्रुत देवस्थान ‘श्री येमाई देवी’

थेट गावातून

संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्यदैवत, कुलदैवत असणारे शिरुर (जिल्हा पुणे) तालुक्यातील शिरुर-मंचर रोड वर कवठे गावच्या दक्षिणेस असणारे श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मनातली इच्छा पुर्ण होत असल्याने भक्तगणांची नवस फेडण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते.

कवठे गावास ऐतिहासिक वारसा ही लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी पुर्वी हे गाव वसलेले होते, अशी अख्यायीका आहे. आज ही या परीसरात सुस्थीतीत व पुर्णत: दगडी बांधकाम असणारी ऐतिहासिक फत्तेश्‍वर, महादेव, विठ्ठल-रखूमाई, भैरवनाथ ही मंदीरे इतिहासाची साक्ष देत ऊभी आहेत. गावात ही हनुमान, विठ्ठल-रखुमाई ही मंदीरे त्याच काळातील असून पवार संस्थानिकांचा भव्यदिव्य राजवाडा ही चार बुरुंज व तटबंदीसह ऊभा आहे. त्याच्या दर्शनी भागातील कलाकुसर अत्यंत विलोभनिय असून, राजवाडा बाहेरुन तरी सुस्थीतीत आहे. सातारच्या कै. सुमित्रा राजे भोसले यांचे कवठे गाव हे माहेर.

गेल्या १०० वर्षांपासुन येथील कदम (तांबटकर) यांचे कलाकुसर युक्त पोलादी अडकित्ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कलावंतांची भूमी म्हणून ही कवठे गाव उभ्या  महाराष्ट्रात प्रसिद्ध असून तमाशा सम्राट बाबुराव कवठेकर यांचे पुत्र विठ्ठल कवठेकर, राज्य पुरस्कार विजेते व भारताचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गौरवलेले प्रसिद्ध ढोलकीपटू गंगारामबुवा कवठेकर, कवी चंदूलाल (निजामशेठ मोमीन), ज्यांनी उभ्या महाराष्ट्रातील तमाशा फडांसाठी गिते लिहून राज्यभर गितांना प्रसिद्धी मिळवली ते शाहीर बी. के. मोमीन कवठेकर (चाकणचे प्रा. दिलिप कसबे यांनी नुकतीच मोमीन कवठेकर यांच्या लेखण साहित्यावर ४ वर्षे अभ्यास करीत, पुणे विद्यापिठात प्रबंध सादर करीत पी.एचडी पदवी मिळवली आहे.) सर्व परीचित आहेत. आकर्शक व कलाकुसुरयुक्त भव्य बांधलेले श्री पार्श्‍वनाथ (जैन) मंदीर व अद्ययावत व्यापारी पेठा यामुळे कवठे गावची रचना मोठी सुंदर वाटते.

कवठे गावचे वैभव असलेल्या श्री येमाई देवीच्या प्राचीन मंदीराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून, सभोवताली असलेले मोठ-मोठे वट व्रुक्ष, उत्तरेस पायऱया असलेली ऐतिहासीक बारव (विहिर), मंदीरातील प्रशस्त गाभारा, समोर मोठा सभा मंडप, देवालयाच्या सभोवताली मोठ्या तटबंदीचा वाडा त्यास पुर्वेकडून व दक्षीणेकडून असलेली भव्य प्रवेशद्वारे, मंदीरा समोरच दोन मोठ्या घाट्या असून, पुर्वेकडील दरवाजा जवळ दोन भले मोठे नगारे आहेत. मंदीराच्या आवरामध्ये ३ ऊंच दिपमाळी असुन नवरात्र,चैत्री पौर्णिमेस त्या पेटविल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोयीसाठी आवारातच खोल्या बांधलेल्या आहेत. मंदीराच्या मागील बाजूस १५ फूट खोल दगडी बांधकामातील महादेवाचे मंदीर असून दगडी पिंड व दगडी नंदी हे मंदीराचे वैशिष्ठ्येआहे. महादेवाच्या मंदीरातून ३ कि.मी. अंतरावर कवठे गावात असलेल्या राजवाड्या पर्यंत पूर्वी भूयारी मार्ग होता.

धार-इंदूर, वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासुन तसेच पुणे, मुंबई, नगर, नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातून देवीचे भाविक-भक्त दर मंगळवारी, पौर्णिमेस देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. देवीची पुजा गोरे पाटील करीत आहेत. दररोज सकाळी ८ व संध्याकाळी ६ वजता नियमित आरती व ओलांडा या ठिकाणी होत असते. विषेशकरुन भाविकांची या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दर पौर्णिमेस रात्री व आषाढ, श्रावण महिन्यातील मंगळवारी सायंकाळी गावातून येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघते.  नवरात्रात देवीचा ९ दिवस मोठा ऊत्सव साजरा केला जातो. होम-हवन व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरे करण्यात येतात. वार्षीक पिक-पाण्याचा अंदाज घेण्यासाठी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदीरासमोर असणारी सुमारे १२५ किलोग्रॅम वजनाची गोटी १३ जणांच्या उजव्या हाताच्या मधल्या एकच बोटाच्या सहाय्याने उचलली जाते. हा मान पिढ्यान पिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांना आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांची कवठे गाव सासुरवाडी असल्याने व त्यांची देवीवर नितांत श्रद्धा असल्याने त्यांनी व विधानसभा अध्यक्ष व या भागाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कवठे गावात अनेक विकास कामे केली आहेत. लवकरात लवकर येमाई मंदीर परीसरास तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळण्याची अपेक्षा मात्र ग्रामस्थ व भाविक करीत आहेत.

कवठे येमाई (ता. शिरूर ) येथील श्री येमाई देवी पुण्यापासून ७० तर शिरूरपासून २७ किमी तर कवठे येमाई गावापासून तीन किमी अंतरावर हे मंदिर आहे.