स्वानंदीचा रुद्रावतार! अंशुमनला चाबकाने दिली शिक्षा; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो चर्चेत

मनोरंजन

मुंबई: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून अंशुमनचा वाढता अरेरावीपणा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अंशुमन आणि मल्लिका यांनी समर-आनंदच्या मैत्रीतही दुरावा निर्माण केल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे.

दरम्यान, होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरही अंशुमनचे वागणे अधिकच उद्धट होताना दिसते. तो आजीशीही व्यवस्थित बोलत नाही, तिचा अपमान करतो आणि तिच्या सांगण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. यामुळे स्वानंदी त्याला सर्वांसमोर जाब विचारताना दिसते.

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अंशुमनचा संतापजनक प्रकार समोर येतो. राजवाडे कुटुंबात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर तो हात उगारतो. “तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस,” असा आरोप करत तो त्या महिलेला त्रास देतो. हा प्रकार स्वानंदीच्या डोळ्यांसमोर घडताच ती संतापते.

स्वानंदी अंशुमनला सुनावत म्हणते, “तुझी हिंमत कशी झाली अंशुमन? एका मुलीवर हात उगारताना लाज नाही वाटली?” इतक्यात समरही तिथे येतो आणि अंशुमनला कठोर शब्दांत सुनावतो. “आता तुला साधी नाही, मोठी शिक्षा झाली पाहिजे,” असे समर सांगतो.

यानंतर स्वानंदी पदर खोचून त्याच चाबकाने अंशुमनला चांगलाच धडा शिकवताना दिसते. “ज्या दिवशी आमची सहनशक्ती संपते… त्या दिवशी तुझ्यासारखा पुरुषही काहीच करू शकत नाही,” असे म्हणत ती त्याला फटके मारते. स्वानंदीचे हे रौद्ररूप पाहून मल्लिका काकू आणि अर्पिता देखील घाबरतात.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्त स्वानंदी, आता पुढचा नंबर त्या मायलेकींचा,” “एक नारी सबपे भारी,” “जबरदस्त प्रोमो,” अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा हा दमदार एपिसोड ९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार असून स्वानंदीच्या या रुद्रावताराची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.