वाघोलीत गेरा बिल्डरकडून म्हाडाच्या ३६० लॉटरीधारकांची फसवणूक

मुख्य बातम्या

वाघोली: म्हाडाच्या लॉटरीतील २५० लाभधारकांनी सदनिकांचे खरेदीखत केले आहे. त्यानंतर बिल्डरने PMRDA कडून इमारतीच्या रचनात्मक बदल मंजूर करून घेत संबंधित लाभार्थ्यांची एक प्रकारे फसवणूक केली आहे. हा प्रकार वाघोली येथील संकेत क्रमांक ४८४ (पुणे) येथील गेरा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडमधील म्हाडा २० टक्के समावेशक योजनेअंतर्गत सृष्टी इमारतीत घडला असून अनेक सदनिकाधारक मिळालेले फ्लॅट रद्द करण्याच्या तयारीत आहे.

याबाबत लाभार्थ्यांनी सांगितले की, इमारतीच्या रचनेत बदल करण्यापूर्वी बिल्डरने रेराच्या नियमानुसार खरेदीखत केलेल्यांची लेखी पूर्वपरवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. त्यांनी परस्पर सोसायटीच्या प्लॅनमध्ये २७ जून २०२२ रोजी बदल केला आहे. फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी रेरा, म्हाडा आणि लाभार्थींना दाखविलेल्या प्लॅनमध्ये इमारतीच्या तिन्ही बाजूने नऊ मीटरची मोकळी जागा सोडली होती. आता ओढ्याच्या बाजूला (पूर्व दिशा) मोकळी जागा कमी करून फक्त ४.५ मीटर ठेवली आहे. यामुळे येथील रहिवाशांना सामुदायिक वापरासाठी, नैमित्तिक गरजांकरता जागा कमी मिळणार आहे. त्यामुळे नवीन मंजूर योजनेतील पूर्वेकडील मोकळी जागा पूर्ववत होईपर्यंत प्रकल्पला स्थगिती द्यावी, अशी खरेदीखत केलेल्यांची मागणी केली असुन सोसायटीच्या खालील बाजूस असलेला मल्टिपर्पज हॉल कमी करून चार फ्लॅट नव्याने बांधणार आहे.

FSI च्या नावाखाली पीएमआरडीएने त्याला मंजुरी दिली आहे, असे सांगण्यात आले आहे. मात्र म्हाडाने लॉटरी जाहीर केली त्यावेळी ३६० फ्लॅटची सोडत काढली होती. त्यानंतर लॉटरी विजेत्यांना रेरा, म्हाडाने दाखविलेल्या प्लॅननुसार सर्वांनी कारार केले. त्यानंतर सर्वांना अंधारात ठेऊन इमारतीचा पूर्ण प्लॅन बदललाच कसा? त्यातच सोडत झाल्यानंतर अचानक ४ फ्लॅट कसे काय वाढले? त्याला म्हाडाकडून परवानगी घेतली का…? असे अनेक प्रश्न सदनिकाधारक उपस्थित करत आहेत.

सुविधांसाठी जागाच नाही…

करार करताना इमारत परिसरात गार्डन लॉन इन ओपन स्पेस, आणि चिल्ड्रन प्ले एरिया अशा सुविधा दिल्या आहेत. मात्र पार्किग प्लॅनमध्ये कोठेही गार्डनचा उल्लेख नसल्याने गार्डनबाबत प्रश्नचिन्हच आहे. गार्डन नसेल तर येथील रहिवाशांची लहान मुले कोठे खेळणार, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार की नाही? त्यातच सृष्टीच्या आवारात हे बांधायचे असेल तर त्यासाठी आवश्यक जागाही बिल्डरने शिल्लक ठेवलेली नाही.

म्हाडासोबत व गेरा बिल्डरसोबत या प्रकल्पापातील सोयीसुविधांबाबत ७-८ बैठका विविध विषयावर घेण्यात आल्या आहेत. त्यावेळी सर्वांना प्रोजेक्टमधील सोयीसुविधा विषयी माहिती देण्याबाबत कॅम्प आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यावेळी बिल्डरने तो घेण्यात येईल असे सांगितले असूनही तो अद्यापही घेतलेला नाही. त्यातच पुन्हा बिल्डरने प्लॅनमध्ये बदल केला जात असल्याने ही एकप्रकारे फसवणूक आहे. त्याबाबत संबधित बिल्डरवर सदनिका धारकांच्यावतीने फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रणवीर देशमुख, सदनिकाधारक, सृष्टी – वाघोली

प्लॅनमध्ये सदनिकाधारकांच्या फ्लॅटमध्ये पार्टिशन दाखविण्यात आले होते. परंतु संबधित बिल्डरने हे बांधकाम करत असताना व खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पार्टिशन काढून टाकले आहे. त्यावरही सदनिकाधारकांनी आक्षेप नोंदवला असून फ्लॅटमध्ये पार्टिशन बसवून देण्याची मागणी केली आहे.

शिवाजी सानप, सदनिकाधारक, सृष्टी- वाघोली,

संबधित बिल्डरने म्हाडाने ठरविलेल्या रकमेव्यतिक्त इतर अॅमेनिटीजच्या नावाखाली अनधिकृतरित्या (नियमबाह्य) ८६,४५० रूपयेप्रमाणे ३ कोटी ११ लाख २२ हजार रूपये घेतलेले आहेत. याची म्हाडाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही कल्पना दिलेली होती. त्यानंतर सृष्टी वाघोलीबाबत नियमानुसार काही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत आहे.

नरेश चव्हाण, सदनिकाधारक, सृष्टी वाघोली

सर्व सदनिकाधारकांचा आक्षेप असल्याने तशी तक्रार पीएमआरडीए, म्हाडाला दिली आहे. त्यांनी संबधित बिल्डरला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचे कंम्पिलशन प्रमाणपत्र (भोगवटा पत्र-बांधकाम पूर्णत्वाचा दाखला) हे सोसायटीकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय ते देण्यात येऊ नये. तरी या तक्रार अर्जाची तातडीने दखल घेऊन वरील चारही विषय मार्गी लावावेत, ही विनंती. अन्यथा संबधित कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

अभिषेक मिसाळ, सदनिकाधारक, सृष्टी वाघोली

बिल्डरकडून पीएमआरडीएसह, म्हाडाच्या अधिकार्यांना अर्धवट माहिती देऊन अंधारात ठेऊन प्लॅन मंजूर करून घेतला आहे. ही शासनाची फसवणूक असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी यात तातडीने लक्ष घालून मंजूरी दिलेल्या संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे. तसेच फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याकडून रस्ता हा सोसायटीचा असल्याचे दाखवून एनओसी घेतली असून ही एक फसवणूक आहे.

भिमराव किरदत, सदनिकाधारक, सृष्टी वाघोली

बिल्डरने या प्रोजेक्टमध्ये गॅलरी न देणे, खेळती हवा नसणे, सुर्यप्रकाश न येणे, अपुरी जागा देणे अशा अनेक चुका केल्या आहेत. या सर्व बाबी म्हाडा, पीएमआरडीएने तपासणे गरजेचे होते. परंतु संबधित बिल्डरने अधिकार्यांना हाताशी धरून सदनिकाधारकांच्या माथी ह्या सदनिका मारल्या आहेत. येथे दीड ते दोन हजार लोक राहणार असून झोपडपट्टीसारखी स्थिती केली आहे.

माधुरी दादाजी घडले, सदनिकाधारक, सृष्टी-वाघोली