स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; ५२ वर्षीय संशयित ताब्यात
शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि शिरूर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२) याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. माहितीची खातरजमा केल्यानंतर कवठे येमाई परिसरात सापळा रचण्यात आला. संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी कारवाई केली असता स्कॉर्पिओमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी शितोळे यांच्या घराजवळ स्कॉर्पिओची तपासणी केली असता त्यामध्ये ६० किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजा आणि वाहन जप्त करून शितोळे याला अटक केली. जप्त अमली पदार्थाची किंमत आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणण्यात आला, तो कोणाला पोहोचविण्यात येणार होता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यामागे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्करीचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत दिवटे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह संजय पड्याळ, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, ओंकार शिरोळे, सतीश मुंढे, सागर धुमाळ, संदीप खेडकर, एस. बी. गावडे, एस. डी. माळी, जे. एस. मचिंदर तसेच फॉरेन्सिक टीमचे प्रेम भालेराव आणि मुस्तकीम सय्यद यांनी कारवाईत सहभाग घेतला.६० किलो गांजाचा साठा सापडल्याने शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे किती विस्तृत आहे, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.