शिक्रापूर पोलिसांकडून पाडव्या आधीच नागरिकांना गिफ्ट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुरात गहाळ झालेले वीस मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील वर्षभरामध्ये गहाळ झालेले तब्बल वीस मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली असून पाडव्या आधीच नागरिकांना पाडव्याचे गिफ्ट मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेकदा मोबाईल गहाळ होण्याचे प्रकार घडत असताना कित्येकदा नागरिक त्याबाबत पोलीस स्टेशनला नोंद देखील करत नाही तर नागरिक मोबाईल परत मिळण्याची अपेक्षां देखील करत नाही. मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी याबाबत गांभीर्याने घेत गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, लखन शिरसकर, जयराज देवकर, किशोर शिवणकर, निखील रावडे, रोहिदास पारखे यांनी गहाळ मोबाईल बाबी सखोल चौकशी करण्यास सुरुवात करत नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईल तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत विविध ठिकाणहून जप्त करुन घेत मोबाईलच्या मूळ मालकांना बोलावून घेत त्यांच्या ताब्यात मोबाईल देऊ केले.

दरम्यान नागरिकांनी अपेक्षा सोडून दिलेली असताना देखील त्यांचे मोबाईल त्यांना परत मिळालेले असताना नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले, तर यावेळी आपले मोबाईल पाहून बोलताना आम्हाला पोलिसांनी गुढी गुढीपाडव्याच्या आधीच पाडव्याचे गिफ्ट दिले असल्याची भावना एका नागरिकाने व्यक्त केली.