रांजणगाव MIDC टप्पा क्रं 3 साठी करडे येथुन लाखों ब्रास मुरुमाची चोरी…?

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन महसूल विभागाचे वेगवेगळे कारनामे समोर येत असुन शिरुर महसूल विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचं “कुरणच” झालं आहे. गावातील कोतवाल ते तहसीलदारांपर्यंत सगळेच यात सामील असल्याने तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना पडत असुन “कुंपणचं शेत खातंय” या म्हणीचा प्रत्यय शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला येत आहे.

शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या, रांजणगाव इंडस्ट्रियल टप्पा क्रमांक 3 करडे येथे नव्याने होत असलेल्या स्टेरिऑन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सपाटीकरण व भरावाचे काम सुरु असून, या कामासाठी करता लागणारा मुरुमाची मोठया प्रमाणात शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून कसल्याही प्रकारची रॉयल्टी न घेता चोरी करण्यात आल्याचा आरोप दिलीप सुदाम लोखंडे आणि मिलिंद रामचंद्र गायकवाड यांनी केला असुन स्टेरीऑन कंपनीला 13 कोटी 33 लाख 35 हजार 105 रुपयांचा दंड ठोठावला असतानाही महसूल प्रशासनाला न जुमानता अजुनही हा “सावळागोंधळ” चालुचं असल्याने तहसीलदार यावर नक्की काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

करडे येथील गट नंबर 1612, 1611, 97 98, 96/2, 93, 94, 95, 94/2, 101,102,104, व 91 मधुन न्यारी कन्स्ट्रक्शन HK यांनी काही स्थानिक राजकीय लोकांना हाताशी धरुन बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले आहे. परंतु हे करत असताना त्यांनी प्रशासनाची कोणतीही पुर्व परवानगी घेतली नाही. तसेच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला असल्याचा आरोप दिलीप लोखंडे आणि मिलिंद गायकवाड यांनी केला असून त्यांनी यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. तसेच तक्रारदाराने यापूर्वीही 15/11/2022 रोजी शिरुर तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

त्याच तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी शिरुर तहसिलदार यांना चौकशीचे आदेश दिले होते. नंतर तहसीलदार यांनी मंडलाधिकारी यांच्यामार्फत सदर जागेचा पंचनामा करून 17 हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन तसेच वापर झाल्याचा पंचनामा करुन स्टेरीऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला 13 कोटी 33 लाख 35 हजार 105 रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु एवढा दंड ठोठावून सुद्धा महसूल खात्याच्या “नाकावर टिच्चून” “मुरुम माफियांनी” येरे माझ्या मागल्या म्हणत परत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरुम उत्खनन करत वाहतूक सुरु केली.

हे सर्व सुरू असताना दिलीप लोखंडे व मिलिंद गायकवाड यांनी परत दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. तसेच उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ETS मशिनद्वारे झालेल्या अवैध उत्खननाची मोजणी करण्यात यावी अशीही मागणी केली. त्यामुळे जिल्हा खणीकर्म अधिकारी संजय बामणे यांनी करडे येथे प्रत्यक्ष भेट देऊन ETS मशीनद्वारे होणाऱ्या मोजणी कामाची पाहणी केली. यावेळी खणीकर्म शाखा निरीक्षक काकासो शिकेतोड, मंडलाधिकारी संतोष नलावडे, तलाठी रविंद्र जाधव,तक्रारदार दिलीप लोखंडे, मिलिंद गायकवाड उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय बामणे म्हणाले की ETS मशीनद्वारे ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झाले आहे त्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर करण्यात येणार असुन त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मुरम चोरांना तालुक्यातील बड्या नेत्याचा राजाश्रय…?
करडे येथील मुरुम चोरी करणाऱ्या व्यक्तींना तालुक्याच्या राजकारणात असणाऱ्या बड्या नेत्याचा “राजाश्रय” असल्यामुळे शिरुर तहसील कार्यालय शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असताही कठोर कारवाई करत नसल्याचे तक्रारदार दिलीप लोखंडे आणि मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. करडे येथे औद्योगिक वसाहत व्हावी या गोष्टीशी आम्हीही सहमत आहे. परंतु शासनाचा “करोडो” रुपयांचा महसूल बुडवून जर फक्त काही राजकीय पुढाऱ्यांचे “बगलबच्चे” चुकीच काम करणार असतील तर आमचा त्या गोष्टीला विरोध आहे.