कोरेगाव भिमातील कंपनीची अठरा टक्क्यांची सावकारी

क्राईम शिरूर तालुका

जगदंबा ॲटो कंपनीकडून कामगाराच्या उचलवर अठरा टक्के व्याज

शिक्रापूर (शेरखान शेख): कोणत्याही कंपनीमध्ये कायम असलेल्या कामगारांना अडचणीच्या काळामध्ये कंपनीकडून उचल स्वरुपात काही पैसे दिले जात असताना कोरेगाव भीमा येथील जगदंबा ॲटो कॉम्पो लिमिटेड कंपनी कडून मात्र कामगाराला दिलेल्या उचलवर चक्क 18 टक्के व्याज लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कंपनीच्या कृतीमुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जगदंबा ॲटो कॉम्पो लिमिटेड कंपनी मध्ये सिद्धेश्वर बिरादार हा 20 वर्षापासून नोकरीवर असून कंपनीमध्ये कायम असताना त्याने कंपनीतील कामगार व अधिकाऱ्यांच्या मदतीने संघटना स्थापन करत संघटनेचा अध्यक्ष झाला. त्यानंतर २०१८ मध्ये बिरादार यांच्या नातेवाईकाच्या उपचारासाठी त्याने कंपनीला अर्ज करत 2 लाख 50 हजार रुपये उचल देऊन दरमहा पगारातून चार हजार रुपये कपात करण्याची विनंती केली असता कंपनीने सदर रक्कम देऊ केली. त्यानंतर २०१९ मध्ये बिरादार याच्या वडिलांना आजार पणासाठी दीड लाख रुपये कंपनीकडून घेतले तर बँकेचे देखील काही कर्ज त्याच्यावर आहे.

कंपनीने दिलेल्या रकमेची परतफेड पगारातून कपात होत असताना अध्यक्ष बिरादार याने कंपनीबाबत शासकीय कार्यालयात काही पत्रव्यवहार केल्याच्या तसेच कंपनी गेटवर झेंडे लावल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे २०२२ पासून बिरादार याला बडतर्फ करण्यात आले. मात्र कायम असल्याने बडतर्फ काळात निम्मा पगार देणे गरजेचे असताना कंपनी व्यवस्थापनाने बिरादार याने घेतलेल्या उचल रकमेवर 18 टक्के व्याज लावत असल्याबाबतचे पत्र बिरादार याला देत त्याला दिलेल्या रकमेवर तब्बल 18 टक्के दरमहा व्याज लावण्यास सुरुवात केली.

सध्या बिरादार याचे वडील अनेक दिवसापासून रुग्णालयात दुर्धर आजाराशी झुंजत असून मित्र व नातेवाईक त्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. मात्र कंपनीने बेकायदेशीर पणे सावकारी सुरु केल्याचा प्रकार घडू लागला असल्याने बिरादार याने याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, उप कामगार आयुक्त, शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना पत्र देत घडलेल्या प्रकाराबाबत न्याय देण्याची मागणी केली असून माझे काही बरे वाईट झाल्यास कंपनी व्यवस्थापक मधील विजय आढाव व बापू पिंगळे यांना जबाबदार धरण्यात यावे असे देखील सिद्धेश्वर बिरादार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जगदंबा ॲटो कॉम्पो लिमिटेड कंपनीचे एच आर विजय आढाव यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता आम्ही व्याज लावलेले नाही, त्यांच्या रकमेतून प्रिन्सिपल रक्कम वजा केलेली असल्याचे विजय आढाव यांनी सांगितले