शिरुर तालुक्यात उच्चशिक्षित नवरीची ताशांच्या गजरात घोड्यावरुन आगळी वेगळी मिरवणुक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सध्या सगळीकडे लगीन सराई चालु आहे. लगीन सराई म्हणलं की नवरदेवाचा मोठा थाट असतो. कर्णकर्कश आवाजात लावलेला डिजे आणि त्या डिजे च्या तालावर बेधुंद अवस्थेत थिरकणारी तरुणाई हेच चित्र आज सगळीकडे पहायला मिळते. परंतु शिंदोडी येथील संदीप नानाभाऊ फडके यांनी मात्र हा सर्व प्रकार मोडीत काढत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नानिमित्त ताशांच्या गजरात घोड्यावरुन मिरवणुक काढत आजच्या युगात खऱ्या अर्थाने मुलगा व मुलगी समान असल्याचा एक आगळा वेगळा संदेश दिला आहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावातील संदीप नानाभाऊ फडके यांची मुलगी पुजा हिचा रविवार (दि 3) रोजी विवाह आहे. सगळीकडे विवाहाच्या आधी ग्रामदैवताच्या पाया पडण्याची प्रथा आहे. त्यासाठी वधू किंवा वर लग्नाच्या आधी गावातील ग्रामदैवताच्या पाया पडण्यासाठी जात असतात. अनेकवेळा वधू किंवा वर यांची डीजे तालावर कर्णकर्कश आवाजात देवळापर्यंत मिरवणूक काढली जाते. परंतु या डीजे च्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच. शिवाय गावातील तसेच परिसरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनाही विनाकारण त्रास होतो.

त्यामुळे संदीप फडके यांनी हा सगळा प्रकार टाळत आपल्या उच्चशिक्षित मुलीची ताशांच्या गजरात घोड्यावरुन मिरवणुक काढत गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. अनेकवेळा मुलांच्या लग्नाच्या वेळेस घोड्यावरुन मिरवणूक काढली जाते. परंतु संदीप फडके यांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता स्वतःच्या मुलीची ताशांच्या गजरात मुलीची मिरवणूक काढत एक वेगळा पायंडा पाडत समाजात आगळावेगळा संदेश दिला आहे.