शिरुर नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व मिळकतदारांनी त्यांची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी त्वरित भरुन सहकार्य करावे अन्यथा जप्तीची कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी दिला आहे.

अधिनियमातील कलम 152 चे तरतुदीनुसार मालमत्तेची जप्ती करणे, थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात तसेच चौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करणे,नळ कनेक्शन तोडणे इत्यादी कार्यवाही (दि. 2) मार्च पासून सुरु करण्यात आलेली आहे तरी मालमत्ता धारकांनी घरपट्टी पाणीपट्टी व थकीत रक्कम त्वरित भरून नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी केले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नागरी संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने विशेष वसुली मोहीम राबविण्याबाबत शासनाने आदेश केलेले आहेत तसेच शहरात दवंडी, सोशल मीडिया, ऑडिओ क्लिप द्वारे, शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावून जनजागृती करुन कर भरण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे.

शिरूर नगर परिषदेने 2022-23 या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम वसुलीसाठी पथके तयार केलेली आहेत.तसेच घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची कार्यवाही जप्ती पथकाद्वारे सुरु केली असून (दि. 2) मार्च 2023 रोजी 7 मालमत्ता सील करण्यात आल्या व 2 मालमत्तांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. या पथकामध्ये कर निरीक्षक रामचंद्र नरवडे, गजानन गायकवाड निखिल कांचन, राजश्री मोरे

दत्तात्रय बरगेविठ्ठल साळुंके व इतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. घरपट्टी व पाणीपट्टी न भरल्यास जप्तीची कारवाई व नळ कनेक्शन तोडले जात आहे. नागरिकांनी कराचा भरणा वेळेत करावा व नगर परिषदेमार्फत जप्तीची कार्यवाही व नळ कनेक्शन तोडण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी ॲड.प्रसाद बोरकर यांनी केले आहे.