भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती: श्रीकृष्णा सारखा पुत्र, मित्र आणि शत्रु मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल. देवकीच्या पोटी कृष्ण भगवान पुत्र म्हणुन जन्माला आले. यशोदेने आई म्हणुन त्यांचा सांभाळ केला. अर्जुनाला मित्र म्हणुन कृष्णाचा सहवास लाभला. तर दुर्योधनाने शत्रु म्हणुन कायमच कृष्णाचा तिरस्कार केला. परंतु तरीही देवाने या सगळ्यांना मोक्ष दिला. कृष्ण परमात्मा देव असुन त्यांनी द्वापारयुगामध्ये मानव अवतार धारण करुन विविध लिला केल्या. त्यामुळेच गेले हजारो वर्षे आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतो असे प्रतिपादन पारगाव (ता. दौंड) येथील ह भ प नितीन महाराज ताकवणे यांनी केले.

शिरुर तालुक्यातील खंडाळे येथील भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था येथील श्री राधाकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काल्याच्या किर्तनात ते बोलत होते. या अखंड हरीनाम सप्ताहात सहा दिवस याच संस्थेत शिक्षण घेणाऱ्या बाल वारकरी विद्यार्थ्यांची कीर्तने झाली. तसेच गुरुवारी (दि 18) रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संस्थेचे संस्थापक ह भ प संतोष महाराज खेडकर यांचे रात्री 10 ते 12 दरम्यान सुश्राव्य कीर्तन झाले तसेच रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा पार पडला. शुक्रवार (दि 19) गोपाळकाल्यानिमित्त संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे अयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह भ प वसंत महाराज नरवडे, बापू महाराज नरवडे, संतोष महाराज जाधव, पिंपरी दुमाला गावचे उपसरपंच संदीप सोनवणे, खंडाळे गावचे सरपंच मारुती नरवडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादा महाराज नरवडे, सचिव धनंजय सावंत, संचालक संदीप धायबर यांनी आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानले.