ठेकेदाराची हलगर्जी अधिकाऱ्यांची डोळेझाक
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ-भीमाशंकर राज्यमार्ग क्र. १०३ वरील रामलिंग-तुकाई मळा ओढा परिसराजवळ, रस्त्याच्या कडेने केबल टाकण्याच्या कामासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला अत्यंत धोकादायक पद्धतीने मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. हे खोदकाम कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता पूर्णतः खुले सोडले असून, रात्रीच्या अंधारात हे खड्डे एखादे वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, मोटारसायकल साठी तर हे अत्यंत धोकादायक आहे.
या ठिकाणी कोणतेही चेतावणी फलक, बॅरिकेड्स किंवा प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे हे ठिकाण अत्यंत धोकादायक बनले आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम उप विभाग, शिरूर यांच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जिवाला आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सदर घटनेबाबत “सामाजिक कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज” यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूरचे सहायक अभियंता अनिल जाधव यांना सदर घटनेची माहिती दिली असून, छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून आपली तीव्र नाराजी नोंदवली आहे.
वाळुंज यांना सहायक अभियंता यांनी सांगितले की याबाबत मला कोणतीही कल्पना नाही, यावर वाळुंज यांनी सांगितले की नागरिकांमधून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या दरम्यान शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहन महिंद्रा बोलेरो आणि अधिकारी गाडेकर हे संबंधित कामाच्या ठिकाणी दिसले होते आणि तेव्हा खोदकामही सुरू होते, यामुळे सदर काम जर कार्यालय प्रमुख यांना खरेच माहिती नसेल तर हे काम विना परवाना सुरू आहे? विभागातील इतर अधिकारी यांना माहिती असूनही येवढा दुर्लक्षितपणा. “सदर बाब सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनाही व्हॉट्सॲपद्वारे कळविण्यात आली आहे.”
सदर रस्ता तालुक्यातील एक प्रमुख राज्य मार्ग असून पुढे उरण पनवेल कडे जोडलेला असल्याने छोट्या व मोठ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते ,जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या बेजबाबदार आणि निष्काळजी कामावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार का? या प्रकरणी जनहित लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासन गांभीर्याने पावले उचलणार का? जनतेच्या जीवाला काही किंमत उरली नाही का? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे. लोकसेवकांनी स्वप्रेरणेनी कर्तव्यादक्ष राहणे गरजेचे असतानाही प्रत्येकवेळी जनतेनीच आवाज उठवला पाहिजे?
निलेश मंदा यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)