शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी आणि भविष्यात उपयोगी पडावी, या विश्वासाने पोस्टात मुदत ठेव करतात. मात्र, याच विश्वासाला तडा देणारा गंभीर आर्थिक गैरव्यवहार गोलेगाव शाखेतील पोस्ट ऑफिस मध्ये उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
खातेदारांकडून मुदत ठेव गुंतवणुकीसाठी स्वीकारलेली तब्बल १५ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम सरकारी खात्यात जमा न करता अपहार केल्याचा गंभीर आरोप शाखा डाकपाल राजेश जबा खुडे (वय ५६, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि.पुणे) यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ठेवीदारांच्या पैशांचे नेमके काय झाले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
तक्रारी झाल्या अन् डाकघराच्या कारभाराची तपासणी सुरु…
गोलेगाव शाखेच्या पोस्ट ऑफिस मध्ये काही खातेदारांनी मुदत ठेव व्यवहारांबाबत तोंडी आणि लेखी तक्रारी केल्यानंतर बारामती डाक विभागाच्या पुर्व उपविभागाने संबंधित शाखेच्या कामकाजाची शंभर टक्के तपासणी सुरु केली. या तपासणीदरम्यान आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला. त्यानंतर या प्रकरणी डाकघर सहायक अधीक्षक शशिकांत सिंग (वय ४५, रा. केडगाव, ता. दौंड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
खातेपुस्तके दिली, नोंदी केल्या; पण…?
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना राजेश खुडे यांनी विविध खातेदारांकडून मुदत ठेव गुंतवणुकीसाठी रोख रक्कम स्वीकारली. त्यानंतर खातेदारांना स्वतःच्या हस्ताक्षरातील खातेपुस्तके देऊन त्यामध्ये खाते क्रमांक आणि व्यवहारांच्या नोंदी केल्या. तसेच डाकघराच्या शिक्क्यांचाही वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, खातेदारांकडून स्वीकारलेली एकूण १५ लाख ४४ हजार रुपये इतकी रक्कम सरकारी खात्यात जमा करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे खातेदारांना दिलेल्या खातेपुस्तकांतील नोंदी, प्रत्यक्ष अधिकृत खात्यांमधील व्यवहार आणि जमा रकमेचा हिशेब यांची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.
चार खातेदारांचे व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी…
या प्रकरणात रवींद्र कोंडीबा थेरुकर, योगिता रवींद्र थेरुकर, मोहन शंकर रसाळ आणि पांडुरंग भगवान वाखारे या खातेदारांच्या मुदत ठेव व्यवहारांशी संबंधित नोंदी व जबाबांचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या व्यवहारांमधून कथित आर्थिक गैरव्यवहार समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ठेवीदारांच्या पैशांचे काय झाले…?
भारतीय डाक विभागासारख्या सार्वजनिक संस्थेत नागरिक पैसे जमा करतात, ते सुरक्षित राहतील आणि गरजेच्या वेळी परत मिळतील, या विश्वासावर. त्यामुळे या प्रकरणातील आरोप केवळ आर्थिक रकमेपुरते मर्यादित नसून, ठेवीदारांच्या विश्वासाशी संबंधित आहेत. स्वीकारलेली रक्कम सरकारी खात्यात जमा झाली नसेल, तर त्या पैशांचा पुढे काय विनियोग झाला, व्यवहारांच्या नोंदी कशा तयार झाल्या आणि या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून स्पष्ट होणार आहे.
शिरुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.