शिक्रापुरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तो व्यक्ती कोमात, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा अन्यथा…

मुख्य बातम्या

भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांना लेखी निवेदन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तसेच चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एक इसम कोमामध्ये गेला असून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करत डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे १२ जानेवारी २०२३ रोजी प्रशांत नामदेव सूर्यवंशी या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील लंघे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान तो व्यक्ती पूर्णपणे व्यवस्थित होता. मात्र काही काळाने रुग्ण कोमात गेल्याने त्याला पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी निष्काळजीपणा तसेच चुकीचे उपचार केल्याने व्यक्तीची प्रकृती चिंताजनक होऊन व्यक्ती कोमात गेला असून हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी हे इसमाच्या जीवाशी खेळल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

सदर हॉस्पिटलच्या कागदपत्रांची चौकशी करुन डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत तसेच सदर हॉस्पिटल बंद करावे अशी मागणी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून याबाबत भीम आर्मीच्या शिरुर तालुकाध्यक्षा दिपिका भालेराव, उपाध्यक्षा कविता भवर, कार्याध्यक्ष हबीब सय्यद, सागर जाधव, हेमंत मासालखंब यांसह आदींनी शिक्रापूर पोलिसांना याबाबत निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे तर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केले नाही तर २३ जानेवारी रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आमचा काही निष्काळजीपणा नाही; डॉ. महेश तेली (लंघे हॉस्पिटल)

शिक्रापूर येथे आमच्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटच्या उपचारामध्ये आमचा कोणताही निष्काळजीपणानसून पेशंटची प्रकृती खालावली होती सध्या पेशंटवर पुण्यातील बुधराणी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून त्याचा सध्याचा खर्च आम्हीच करत असल्याचे लंघे हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश तेली यांनी सांगितले.