शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. परंतु नंतर सोशल मिडीयावर नेटीझन्सने हे प्रकरण उचलुन धरल्यावर मात्र त्या मुलासह त्याच्या वडिलांवर तसेच आजोबांवर कडक कारवाई करण्यात आली. शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात आहे. यावर पोलिसांनी अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

शिरुर तालुक्यातही अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात सध्या दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या देत असल्याचे चित्र असुन ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांच्या हातात ट्रॅक्टर, मालवाहू चारचाकी गाड्या सर्रास दिसत असुन हि अल्पवयीन मुले वेगात गाड्या पळवत आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्यासारखा गंभीर अपघात होण्याची शक्यता ग्रामीण भागातही नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनीही अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देताना काळजी घेणे गरजेचे आहे.

 

शेतासाठी माती वाहतुक करणारे ड्रायव्हर अल्पवयीन…

सध्या निमोणे, शिंदोडी, गुनाट परीसरात घोड धरणातील काळी माती आणुन शेतात टाकत असुन ह्या माती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर असणारे काही चालक अल्पवयीन आहेत. तर काही ट्रॅक्टर चालकांकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना नाही. तसेच हे चालक मोठया मोठया आवाजात गाणी लाऊन वेगात ट्रॅक्टर चालवत असतात. त्यामुळे भविष्यात जर पुण्यासारखी घटना झालीच तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

 

वाहनांची कागदपत्र तपासणी होणे गरजेचे… 

त्यामुळे घोड धरणातुन माती वाहतुक करणाऱ्या शेतकऱ्यांकडे माती वाहतुक करण्याची रीतसर परवानगी आहे कां…? तसेच जेवढे जेसीबी आणि ट्रॅक्टर माती वाहन्यासाठी वापरले जातात. त्यांचा इन्शुरन्स आहे कां…? तसेच जेसीबीचा चालक आणि ट्रॅक्टर चालकाकडे रीतसर ती वाहने चालविण्याचा परवाना आहे कां…? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

 

आलिशान महागड्या कार अन बेफाम तरुणाई…

शिरुर तालुक्यात गेल्या 25 ते 30 वर्षात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत झाल्याने नागरिकीकरणामुळे तालुका विस्तारला आहे. एमआयडीसीमुळे कोरेगाव भिमा, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, बाभुळसर, करडे आदी भागात लोकांची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे भौतिक सुविधांमागे धावणारा हा घटक तोलामोलाचा झाला आहे. त्यातून चंगळवादी प्रवृत्ती फोफावली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला अल्पवयीन तरुण बेफामपणे वाहने चालवित आहे. त्यातुनच पुण्यातील पोर्शे पॅटर्नची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.